शिरपूर तालुक्यात २ कोटी १५ लाखांचा गांजा हस्तगत

Featured धुळे
Share This:

शिरपूर ( मनोज भावसार ) : तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाच्या शिवारात मांगिलाल बारकु पावरा याच्या शेतात तब्बल दोन कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा गांजाचा साठा पोलिसांनी पकडला. मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमाराला पोलिसांनी गांजाच्या अड्ड्यावर छापा मारला़ त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मुद्देमालाचे मोजमाप सुरू होते. पोलिसांनी छापा मारल्यानंतर मांगीलाल बारकु पावरा (रा़ लाकड्या हनुमान) हा संशयित फरार झाला आहे़ त्याच्याविरुध्द शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलिसांनी छापा मारला त्यावेळी हिरवट रंगाची पाने, बीया व काड्यांचा चुरा असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ वेगवेगळ्या प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये भरलेला होता़ वजनकाटाधारक राजाराम वंजारी याच्याकडून मोजून अंदाजे ३० किलो वजनाच्या १२८ गोण्या भरुन ठेवल्याचे निदर्शनाला आले़ गाजांच्या साठ्याचे एकूण वजन तीन हजार ९०४ किलो आहे़ सदरचा गांजा पाच हजार ५०० रुपये किलो दराने विकला जातो असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़ या साठ्यातून प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचे तीन नमुने पोलिसांनी घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ हा संपूर्ण साठा पोलिसांनी जप्त केला आहे़. शिवाय घटनास्थळावरुन २५ हजार रुपये किंमतीची मोटारसायल आणि लोखंडी तगारींना साखळी लावून तयार केलेला तीन हजार रुपये किंमतीचा वजन काटादेखील जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक पाटील आदींनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली़

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *