
दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार- उद्धव ठाकरे
मुंबई (तेज समाचार डेस्क): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतरच ठरवणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मला कोणत्याही परिस्थितीचं राजकारण करायचं नाही, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, हेलिकॉप्टरमधून नाहीतर जमिनीवरुन पाहणी करतोय. मी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.