दोन तासातच उरका लग्न अन्यथा भरावा लागेल 50 हजारांचा दंड

Featured महाराष्ट्र
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क):   कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून याला कुठेतरी थांबवण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमावलीमध्ये लग्न करण्याऱ्यांनी नियमाचं पालन करावं लागणार आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये लग्नसमारंभासाठी यापूर्वी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु, सुधारित आदेशानंतर आता फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा लागणार असून फक्त दोनच तास वेळ लग्नासाठी देण्यात आला आहे.

नवीन आदेशानुसार लग्न कार्यक्रम आणि लग्नाचे सर्व विधी हे फक्त 2 तासांमध्ये आटोपून घ्यायचे आहेत. या नियमांचे पालन न झाल्यास 50 हजार रुपयांचा दंड राज्य सरकारकडून वसूल करण्यात येणार असल्याचंही नवीन आदेशात म्हटलं आहे. एप्रिल आणि मे महिन्यात लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे राज्य सरकारने यासाठी एक निर्धारित वेळ दिला आहे. जर कोणी या नियमाचं उल्लंघन केल्यास संबंधितांना 50 हजार रूपयाचा भूर्दंड भरावा लागणार आहे.

दरम्यान, खासगी वाहतुकीसाठी आता फक्त वैद्यकीय किंवा इतर अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांना प्रवास करता येणार आहे तसेच गाडीच्या आसन क्षमतेच्या 50 टक्केच प्रवासी गाडीमधून प्रवास करू शकणार आहेत. याबरोबरच जिल्हाबंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *