धुळे वैद्यकीय महाविद्यालयात आणखीएक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 10 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित

Featured धुळे
Share This:

धुळे :  श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे एका रुग्णाचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, नागरिकांनी घाबरू नये, घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ) : धुळे महानगरपालिका हद्दीत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचे (COVID 19) 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी धुळे शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत 4 मे 2020 च्या रात्री 00.01 वाजेपासून ते 10 मे 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन (संचारबंदी) लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. ही संचारबंदी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग पाहता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच धुळे जिल्ह्याला लागू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात व मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा गावात कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता असल्याने जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून ही संचारबंदी लागू राहील.
या संचारबंदीतून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व त्या अनुषांगिक सेवा, औषधे विक्रीची दुकाने, किराणा दुकाने, शासकीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाहतूक व धान्य वाटप, दूध, भाजीपाला व फळे विक्री दुकाने, अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व कायदा सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा, बँक यंत्रणा, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी वगळता अन्य सर्व व्यवहार हे दिलेल्या कालावधीत व अटीस अधिन राहून बंद राहतील.
कोविड-19 प्रतिबंधित क्षेत्र (Containment Area) वगळून इतर क्षेत्रातील अधिकृत किराणा दुकाने, स्वस्त धान्य विक्रीची दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने ही सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीत सुरु राहतील. दूध विक्रेत्यांसाठी सकाळी 6 ते रात्री 8, तर पेट्रोलपंपचालकांसाठी ही वेळ सकाळी 6 ते दुपारी 2 अशी असेल. तसेच सदरचा आदेश हा सद्य:स्थितीत व भविष्यात कोविड-19 प्रतिबंधित क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रास लागू राहणार नाही. सदरच्या (Containment Area) प्रतिबंधीत क्षेत्रात कन्टेन्मेंट अधिसूचनेनुसार घोषित प्रतिबंधानुसार अंमलबजावणी होईल.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य ती कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *