
अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही- शरद पवार
मुंबई (तेज समाचार डेस्क): परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. या पत्रकार परिषदेत पवारांनी फेब्रुवारीचा घटनाक्रम सांगितला आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत. अनिल देशमुख 5 ते 15 फेब्रुवारीमध्ये कोरोना झाल्यामुळे रूग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातून ही माहिती घेतली आहे. तर 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशमुख होम आयसोलेशनमध्ये होते, अशी माहिती पवारांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली नाही. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलवून वसुलीचे आदेश दिले, असं सिंग कशाच्या आधारावर बोलत आहे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तपास भटकवण्यासाठी असे आरोप केले जात आहेत, असा आरोपही शरद पवारांनी केला आहे. पत्रकारांनी शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का, हा प्रश्न विचारला. तेव्हा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असं शरद पवार म्हणाले.