मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक-बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

Featured मुंबई
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क):  महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची गेल्या 24 तासातील आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 3 हजार 672 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 5 हजार 542 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 57 हजार 342 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 89 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 5 लाख 83 हजार 873 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील आजची रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचं दिसून येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *