
पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा!
मुंंबई (तेज समाचार डेस्क): राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीला सुरुवात झाली आहे. पण पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आताही औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेतला गारवा कमी झाला. अशा अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे. त्यामु बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे. राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे.