
आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे
मुंबई (तेज समाचार डेस्क): मराठा आरक्षणाना सर्वोच्च न्यायालयानी तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाचा विषय अधिक गंभीर झाला असून नोकरी भरतीलाही स्थगिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा निर्णय हाेत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये, असं शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. रविवारी 20 डिसेंबर रोजी मराठा समाजातील विविध पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बैठकीसाठी उपस्थित होते. त्यावेळी विनायक मेटे बोलतं होते.
मेटे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने नवीन कायदेतज्ज्ञांचा समावेश करून पुढील रणनीती ठरवावी. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार काय करणार याबाबत ४ जानेवारीपर्यंत सरकारने चर्चा करावी आणि जो निर्णय घेतला त्याबाबत पुन्हा मराठा समाजातील नेत्यांची बैठक घेऊन माहिती द्यावी. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये.” दरम्यान, डिसेंबरपर्यंत सरकारने काहीच हालचाल केली नाही तर जानेवारीत बैठक घेऊन आगामी काळातील आंदोलन, रास्ता रोको, धरणे आंदोलन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही मेटे म्हणाले.