
वर्दीतला… कवी मनाचा…दर्दी माणूस मायभूमीत येतोय कर्तव्यासाठी !
वर्दीतला… कवी मनाचा…दर्दी माणूस मायभूमीत येतोय कर्तव्यासाठी ! In uniform … poet of mind … patient man is coming to Mayabhumi for duty!
आज पुन्हा काहीतरी खास विषयावर अभ्यस्त होऊन,जिवाभावाच्या माणसा विषयी लिहावे म्हणून चिंतनस्त होतो…प्रारंभ कुठून करावा या विवंचनेत असतांना कवी सुरेश भट यांची माय भूमी वरील कवीता आठवली.आणि बुद्धीला चालना मिळाली,कारण ज्या हृदयस्थ माणसा बद्दल मला लिहायचे होते किंवा आहे; तो सुद्धा आपल्या मातृभूमीवर प्रचंड प्रेम करणारा…अन विशेष म्हणजे बालपणापासून कवी मनाचा आहे.कवी सुरेश भट म्हणतात ….
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणिन आरतीला हे सूर्य , चंद्र , तारे
आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा
आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला
जेंव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला
मी पायधूळ घेतो जेंव्हा तुझी जराशी
माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी
आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून गाणी…
या मायभूमीच्या वर्णनरुपी सौन्दर्यात कवींनी जे शब्दालन्कार वापरलेत ते वाचून ज्याचे हृदय पाझरणार नाही, ज्याचे डोळे पाणावणार नाहीत तो पाषाण हृदयीच असेल वाचकहो…लिखाणाचा विषय आणि निमित्त वर उल्लेखित असेच आहे.
आज चोपडा या; स्व मायभूमीत, जन्मभूमीत उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) म्हणून आदरणीय श्री राजेंद्र शंकरराव रायसिंग हे कर्तव्यास येत आहेत.या प्रसंगाचा जेव्हढा आनंद त्यांच्या परिवाराला आहे.कदाचित तेव्हढाच आनंद मला देखील आहे. साहेबांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग दोन – तीन वेळा आला असेल.
प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या संस्थेचा ‘दर्पण पुरस्कार’ त्यांना सन 2017 या वर्षी मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रदान केला. त्या काळात मी आणि संस्थेचे सचिव श्री लतीश जैन त्यांना प्रत्यक्ष भेटलो, बोललो,पहिल्याच भेटीत एखाद्याच्या प्रेमात पडावं; हे कशाला म्हणतात याचा साक्षात्कार त्या दिवशी झाला पण आपलं एकतर्फी प्रेम म्हटल्यावर गप-गुमान बसणं योग्य! हा सावध पवित्रा घेतला.पुढे ओळख वाढली.
रायसिंग साहेब 1986 MPSC परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले.रायसिंग साहेब चोपडा तालुक्यातील चहार्डी या गावचे असले तरी त्यांचे जन्मगाव लासुर.वडील लासुर या गावातच 23 वर्ष आदर्श शिक्षक म्हणून विद्या दानाचे महान कार्य करीत असल्याने साहेबांचे प्राथमिक – माध्यमिक शिक्षण लासुर गावीच झाले. महाविद्यालयीन शिक्षण चोपडा येथील म.गांधी महाविद्यालयात पूर्ण केले. वडील हाडाचे शिक्षक; त्यामुळे देशसेवेचे बाळकडू अल्पवयात घरातूनच मिळाले. वडिलांची आज्ञा देवाज्ञे समान मानणारे साहेब आणि त्यांचे मोठे बंधू ज्यांना संपूर्ण तालुका आज आदराने अण्णा म्हणतो असे आनंदराव रायसिंग दोघे उच्च शिक्षित.वडिलांच्या जाण्यानंतर परिवारात त्यांची उणीव न भासू देणाऱ्या अण्णांचा आनंद आज गगनात मावत नसेल.गरिबाला त्रास देऊ नका,उलट त्यांची – अडल्या नडल्यांची कामं करा ही वडीलांची शिकवण आजही दोघांत बघायला मिळते.पोलीस दलात अधिकारी म्हणजे बक्कळ पैसा रूबाब असा समज फार पूर्वीपासून आहेच पण सारेच अधिकारी पैशा मागे धावतात असे नाही काही पैसे कमावतात , काही नाव कमावतात काही विश्वास कमावतात,काही आदर,काही पुण्य,काही आशिष,काही मैत्री ,काही सन्मान कमवतात…
प्रत्येकाची आपापली कामाची पद्धतअसते. पोलीस दलात अलीकडे एखादा अधिकारी स्मार्ट असला म्हणजे त्याला ‘सिंघम’ म्हणण्याची प्रथा आम्हीच वाचाळ पत्रकारांनीच रूढ केली आहे.आता सारेच सिंघम झाले तर समाज सुधारेल असे होईल का? प्रसंगावधान राखून कामाची हातोटी जो वापरतो तो सक्सेस होतो.तो सर्वकाही मिळवतो,तोच अधिकारी समाजमनावर वर्षानुवर्षे राज्य करतो.तेच श्री रायसिंग साहेबांनी कमवले आहे.वर्दीत असले तरी त्या वर्दीत एक कवी..एक दर्दी..मित्र.. सखा..पालक..गुरु..समाजसेवक ..कर्म..धर्म..मानणारा..कुटुंब वत्सल असे अनेकविध रूपं बघायला मिळतात.ते वर्दीत असले तरी दर्दी आहेत,अन म्हणूनच कायम ते गर्दीत असतात.साहेब एक उत्कृष्ट शिघ्रकवी देखील आहेत लेक वाचवा अभियानावर त्यांच्या रचलेल्या कविता वाचनीय आहेत.अनेक कवी संमेलनात त्यांना आदराने बोलवले जाते. साहेबांचा मैत्रीचा गोतावळा फार मोठा आहे.
त्यांनी नागपूर, मालेगाव, पुणे,मुंबई, जळगाव नंदुरबार, नवापूर,शिरपूर,शहादा, धुळे,फैजपुर आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.अनेक मोठे गुन्हे त्यांनी उलगडले आहेत.सन 2014 मध्ये नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असतांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल महामहिम राज्यपाल के विद्यासागरराव यांच्या हस्ते राष्ट्रपति पोलीस पदक,राज्यपालांच्याच हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार,पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह,असे अनेक मानाचे शासकीय पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे;तर लहान मोठे किमान चारशे पुरस्कार त्यांना आजवर मिळालेले आहेत.काही माणसं पुरस्कारांमुळे मोठे होतात तर काही माणसांमुळे पुरस्कार मोठा होत असतो.प्रेरणा दर्पणचा ‘दर्पण पुरस्कार’रायसिंग साहेबांमुळे मोठा झाला हे सांगायला संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला नेहमीच अभिमान वाटतो. महाराष्ट्रात गाजलेले जळगावचे सेक्स स्कँडल असेल,करोडो रुपयांची चांदी जप्ती,शहादा – नंदुरबार येथे असतांना आतंकवादी पकडणे,असे किती तरी प्रकरणे त्यांनी आपल्या बुद्धीचातुऱ्याच्या बळावर उलगडुन दोषींना गजाआड केले आहे.शालेय जीवनात हॉलीबॉल प्लेअर असलेले साहेब आजही पोलीस उप अधीक्षक पदावर असतांनाही आपल्या मित्रांना विसरलेले नाहीत आणि लासुरकर त्यांना कधी विसरले नाहीत आजही लासुर गावात कोणताही कार्यक्रम असला की साहेबांना त्याचे निमंत्रण येणार हे अधोरेखित आहे .एड्सग्रस्त रुगणांचे पुनर्वसन त्यांनी शहादा येथे असतांना एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून उभारलेली चळवळ आजही कायम आहे.आपल्या कष्टाच्या कमायीतील काही भाग आजही या कामांना जातो.’दंगल स्पेशालिस्ट’ म्हणून रायसिंग साहेब नाशिक परिक्षेत्रात प्रसिद्ध आहेत.शहादा येथे जातीय दंगल फार मोठ्या प्रमाणात भडकेल अशी काहीशी परिस्थिती असतांना खास त्यांना पाचारण करण्यात आले होते,वरिष्ठ अधिकारी यांनी घेतलेला निर्णय सार्थ ठरवत होणारी दंगल शमवली होती.नशीब साथ देत नाही,परिस्थिती नाही,सोयी सुविधा नाहीत असे म्हणत दोष देत बसणाऱ्या आजच्या तरुण पिढीसाठी डी वाय एस पी रायसिंग साहेब उत्कृष्ट अनं जिवंत उदाहरण आहेत.पोलीस दलात रूबाब,समाजात मान – सन्मान,परिवारात शब्दाला झेलणारे सदस्य , जीवापाड काळजी घेणारे जेष्ठ बंधू हे सारे ऐश्वर्य असतानाही निर्व्यसनी रहाणं ते ही पोलीस दलात? विश्वास न बसण्याजोगेच आहे.पोलीस दलात एखादा अधिकारी रात्रीच्या लाईम लाईट पार्टीत येत नसेल तर;मित्रमंडळी नंतर,आधी कर्मचारीच टिंगल-टवाळी करतात आमचे साहेब म्हणजे ह.भ.प.आहेत बुवा पण कालांतराने सगळ्यांची तोंड बंद होतात आणि असे अधिकारी येणाऱ्या पिढीसाठी ‘आयडॉल ‘ ठरतात.पोलीस दलात मन आणि हात स्वच्छ ठेवूनही मान सन्मान कमवता येतो,अशा शिकवणी साठी रायसिंग साहेबांचे नाव घेतल्या जाते.वेळेशी दोन हात करून आपली जागा कशी निर्माण करायची असते,हे कळावं
म्हणूनही हा आजचा लेख प्रपंच आहे ठिणगीची मशाल व्हावी पण त्या मशालीने वाटसरूंना वाट दिसावी;जेणेकरून येणाऱ्या पिढीत समाजा प्रती संवेदना.. संस्कार..संस्कृती..संयम ..शील..सद्बुद्धी..क्षमा..शांती..सेवाभाव ….साहस..सुजाणता..या सद्गुणांचा समावेश व्हावा.गाव छोटं की मोठं याच्याने काहीही फरक पडत नसतो.पाहिजे ती फक्त इच्छा शक्ती.आज श्री राजेंद्र रायसिंग साहेब आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी म्हणून कर्तव्यास येत आहेत. उपऱ्याना उरावर घेण्यासाठी आम्ही चोपडेकर कमालीचे प्रसिद्ध आहोत.आज आपल्या माणसाला खांद्यावर घ्या.सीमेवर सैनिक, आणि गाव पातळीवर पोलीस हा आहे म्हणून आपण निश्चिन्त आहोत हे विसरू नका.रील हिरो पेक्षा रिअल हिरोला सन्मान द्यायला शिकू,त्यांच्याकडून तर न्याय मिळेलच आपणही त्यांना न्याय देऊ..
चोपडा या आपल्या जन्मभूमीत श्री रायसिंग साहेबांचे मनःपूर्वक स्वागत.
