
”दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक, हे सर्व भामटे लोक”
अहमदनगर (तेज समाचार डेस्क): केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता देशातून समर्थन दिलं जात आहे. मात्र अशातच महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिल्लीतील आंदोलनावर घणाघाती टीका केली आहे.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात काम करणारे हमाल अधिक आहेत. त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचंं आहे असं आपण मानत नसल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगरमध्ये ते बोलत होते. दिल्लीतील आंदोलनात जे लोक गोळा झाले आहेत हे सर्व भामटे आहेत. दिल्लीतील हे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबागच सुरू झालं आहे. याच्यापेक्षा त्याला दुसरा अर्थ नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, शेतकऱ्यांसंदर्भात याआधीही असे काही कायदे झाले आहेत. त्या कायद्यांबाबत कोणीच बोलत नाहीत. त्या कायद्यांपासून जास्त त्रास शेतकऱ्यांना आहे. मात्र त्याबाबत कोणी एक शब्दही उच्चारायला तयार नसल्याचं रघुनाथदादा पाटील म्हणाले.