‘मी मोठी व्यक्ती नाही’ – “आचार्य दादा”

Featured जळगाव
Share This:

‘मी मोठी व्यक्ती नाही’ – “आचार्य दादा”

आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पितपणे जगलेले व सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्या देशभरातील सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे सेवावर्ती व्यक्तीमत्व म्हणजे जळगाव येथील जळगाव जनता सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष असलेले आदरणीय डॉ. अविनाश आचार्य ऊर्फ आचार्य दादा होय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जळगाव येथे संघ विचारांनी सुसंस्कारीत झालेल्या काही स्वयंसेवकांना सोबत घेऊन दादांनी २० जानेवारी १९७९ रोजी जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना केली. शासनाच्या तत्कालीन सहकार कायद्यानुसार बँकेने आपल्या एकूण नफ्यातील दहा टक्के रक्कम ही सामाजिक सेवाकार्य करणाऱ्या संस्थांना देणे बंधनकारक होतं. म्हणून या रक्कमेतून आपणच सामाजिक कार्य करायचं, हा विचार संघ स्वयंसेवक असलेले दादा यांनी करणे स्वाभाविक होतेच. त्या विचारांतून दादांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावाने ‘केशव स्मृती सेवा संस्था समूह’ स्थापन केला.

जळगावच्या नवीपेठीतील आपल्या जनता बँकेच्या मुख्यालयाचे नावही दादांनी ‘सेवा’ असेच ठेवले. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आदी क्षेत्रांत जवळजवळ २० सेवाभावी प्रकल्प आजही सुरू आहेत. त्यात रौप्यमहोत्सवी वर्षे नुकतेच साजरे झालेला झुणका भाकर केंद्र, वैद्यकीय क्षेत्रातील नेत्रपेढी आणि रक्तपेढी, मातोश्री वृध्दाश्रम, विवेकानंद प्रतिष्ठान विद्यालय, बस व रेल्वेस्थानकांवर भरकटलेल्यांसाठी निवारा केंद्र आदी सेवा प्रकल्पांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

स्रीरोग प्रसूतीतज्ञ असलेले आचार्य दादासाहेब यांनी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सेवाकार्य करताना कधीही प्रसिद्धीला महत्त्व दिलं नाही. एक पत्रकार म्हणून बँकेच्या अनेक पत्रकार परिषदा, सेवाभावी उपक्रम, सर्वसाधारण सभा, निवडणूक, संघ परिवारातील विविध मोठ्या व्यक्तींचे बौद्धिक आदी कार्यक्रमांचे वृत्तांकन करण्याची संधी मलाही मिळाली. त्यानिमित्ताने दादांना समजून घेता आले.

विशेष म्हणजे आपल्या दैनिक सकाळच्या खानदेश आवृत्तीला ११ अॉगस्ट २००४ रोजी जळगावमधून सुरुवात झाली. त्यावेळी ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ या पुरवणीत ‘मोठ्यांचं गाव’ आणि ‘मोठी व्यक्ती’ ही सदरे सुरू होती. मी २००४मध्ये ‘मोठ्यांचं गाव’ या सदरासाठी निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी यांचे जन्मगाव असलेलं ‘धरणगाव’ येथे प्रत्यक्ष जावून त्यावर लिहिलं होतं.

‘मोठी व्यक्ती’ या सदरासाठी आचार्य दादा यांना भेटण्यासाठी त्यांचे श्री. कुलकर्णी नामक स्वीय साहायक यांच्याशी बोललो. मात्र, दादा त्यासाठी तयार होणार नाहीत, असे लक्षात आलं. तरीही मी प्रयत्न मात्र, सोडले नाहीत. काही दिवसांनी परवानगी मिळाली आणि जयकिशनवाडी परिसरातील ‘पद्मालय’ या शासकीय विश्रामगृहासमोरील दादांच्या घरी ठरल्याप्रमाणे सकाळी बरोबर साडेआठला पोहोचलो. त्यांनी भेटीचं प्रयोजन विचारल्याने मी दैनिक सकाळच्या ‘मोठी व्यक्ती’ या सदरासाठी आपल्याशी बोलणार असल्याचे सांगितलं. परंतु, त्यांनी लगेचच ‘अरे मी मोठी व्यक्ती वगैरे नाहीये. म्हणून माझ्याकडे त्याबाबत सांगण्यासारखंही काही नाहीच.’ असे दादा म्हटले. तरीही मी चहा घेत दादांशी सहजपणे बोलत राहिलो आणि त्यातूनच माझं ‘मोठी व्यक्ती’ या सदरासाठीचा मजकूर जन्मास येऊन एका रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला. मंडळी, समाजात खरोखरच प्रत्यक्ष मोठं काम करूनही त्याचे श्रेय नाकारणारे सेवावर्ती आदरणीय डॉ. अविनाश आचार्य ऊर्फ दादांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली.

 

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *