लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?-AIMS च्या संचालकांनी दिली माहिती

Featured महाराष्ट्र
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरेल का? याबाबत वक्तव्य केलं आहे. भारतातील अथवा जगभरातील आकडेवारीतून बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून आलेलं नाही. दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या बालकांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली तसेच काही बाधित बालकांना इतर आजार असल्याचं दिसलं. यापुढेही बालकांमध्ये कोरोनाचा गंभीर संसर्ग आढळून येईल असं मला वाटत नाही, असा विश्वास गुलेरिया यांनी व्यक्त केला.

रुग्ण संख्या कमी झाली, की अनलॉक होते आणि लोक निष्काळजी बनतात आणि पुढची लाट सुरू होते. जोवर अधिकांश लोकांचे लसीकरण होत नाही, तोवर आपल्याला सतर्कता बाळगावी लागेल. सध्या कुठल्याही देशात असा कुठलाही डेटा आलेला नाही, ज्यावरून मुलांना अधिक धोका आहे, असं सांगितं जाऊ शकेल, असंही गुलेरिया यांनी सांगितलं. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, लोकांत आतापासूनच तिसऱ्या लाटेची भीती दिसत आहे. काही तज्ज्ञांचं मत होतं की तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकेल. यामुळं मुलांचे पालक चिंतीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *