
वीज बिलाची होळी आंदोलन जिल्ह्यात होणार – विजय चौधरी
नंदुरबार ( प्रतिनिधी – वैभव करवंदकर) – लॉकडाऊनच्या कालावधीत आलेले वीज बिल माफ करावे. ह्या मागणी साठी भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी संपूर्ण जिल्ह्यात वीज बिलाची होळी आंदोलन करणार आहे.
पत्रकार परिषदेत विजय चौधरी म्हणाले की , कोरोना महामारी च्या अनुषंगाने लॉकडाउनच्या कालावधीत वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील जनतेला भरमसाठ वीज बिले आली आहेत. कुणाला दुप्पट तर कुणाला चारपट बिले आली आहे. विज बिल पाठवितांना ऊर्जा खात्याने प्रचंड गोंधळ घातला. सरासरीच्या नावाखाली नियमबाह्य बिले पाठविण्यात आली. छोटे-मोठे व्यवसाय हे बंद असताना देखील चार पट पाचपट विज बिले आली आहेत.
या संदर्भात नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीने संबंधित वीज वितरण विभागाचे अधिकारी तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे वाढीव बिलाबाबत तक्रार केली होती व ग्राहकांना न्याय देण्याची मागणी केली होती. यावेळीस राज्याचे ऊर्जामंत्री यांनी ग्राहकांना दिलासा देऊ , वीज बिल माफ करू सरकार महावितरण कंपनीला एक हजार कोटी रुपये देईल असे देखील आश्वासन दिले होते. केवळ हा विषयी नंदुरबार पुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या वीज ग्राहकांचा झाला आहे. त्या अनुषंगाने विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडवणीस , भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील वीज ग्राहकांचे आलेले वाढीव वीज बिल माफ करावे अशी मागणी केली होती.
लॉकडाऊनच्या काळात मध्य प्रदेश , गुजरात , केरळ या राज्यांनी वीज बिलात 50 टक्के सवलत दिली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने एक रुपयासुद्धा माफ केला नाही. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठी आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महा विकास आघाडी सरकारने इतर राज्याप्रमाणे हातावर पोट भरणारे श्रमिक , रस्त्यावरील व्यवसायिक , बारा बलुतेदार , शेतकरी रिक्षाचालक , टॅक्सीचालक यांना मदत करण्याची आवश्यकता असताना मदत करायचे तर सोडाच उलट त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये वीज बिले आकारले जात आहे.