
काही वेळासाठी गुगल, ई-मेल सेवा झांली बंद, जगभरात उडाला गोंधळ
मुंबई (तेज समाचार डेस्क). जगभरात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद झाली होती. ई-मेल सोबतच यूट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्ह देखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्ताप झाला. कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले होतेत. भारतातही जीमेल आणि यूट्यूब सेवा डाऊन झाली होती. प्रसिद्ध वेबसाईट डाऊन डिक्टेटरच्या माहितीनुसार गुगल, यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह या सेवा वापरताना अनेक अडचणी आल्यात. गुगल अनॅलिटिक्स, गुगल स्प्रेडशीट वापरण्यातही अडचणी होत्या.
‘यूट्यूब वापरताना अनेकांना अडचणी येत असल्याची माहिती आहे. आमची टीम सर्व यावर काम करत आहे. सर्व सुरळीत झाल्यावर आम्ही तु्म्हाला याबाबत माहिती देऊ’, असं युट्यूबने ट्विटरवर सांगितले होते.
गुगल, जीमेल, यूट्यूब डाऊन झाल्याची माहिती आल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला. थोड्या वेळात ट्विटरवर ८१ लाखांपेक्षा जास्त ट्विट यूट्यूब डाऊन विषयी झाले. २७ हजारांपेक्षा जास्त ट्विट गुगल डाऊन विषयी करण्यात आले आहेत. ट्विटरवर तर यूट्यूब आणि गुगल डाऊन हे विषय ट्रेडिंगला आले आहेत.