
…तर कोव्हॅक्सिन टोचून घेऊ नका; भारत बायोटेकनेच दिला गंभीर इशारा
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरु झालं आहे. स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडली असून, तिसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांना पाहता कंपनीनं लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे.
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ते जे औषध घेत आहेत ते प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे असंल तर कोव्हॅक्सिन लस टोचून घेऊ नये, असं कंपनीनं म्हटलं आहे.
याआधी सरकारनं सांगितलं होते की, ‘प्रतिकारशक्ती कमी असलेले व्यक्तीदेखील लस घेऊ शकतात. तेव्हा असा समज होता, की अशा लोकांमध्ये ही लस कमी प्रभावी असेल. किमोथेरपी, एड्स झालेले आणि स्टेरॉईड घेत असलेले लोक या श्रेणीमध्ये मोडतात. या लोकांना कोरोनाचे संक्रमण वेगाने होऊ शकते. परंतू त्यांच्यावर या लसी काम करत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तसंच,भारत बायोटेकनं ब्लिडिंग डिसऑर्डर असलेल्या लोकांनादेखील लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक गंभीर स्वरुपात आजारी आहेत, ताप आहे किंवा त्यांना कोणत्याही अॅलर्जीचा इतिहास आहे, गर्भवती किंवा स्तनदा माता यांनी लसीपासून दूर रहावे, असंही कंपनीने म्हटलं आहे.