‘केशव’सेवेचा आठवणीतून जागर !- सुशील नवाल

Featured इतर जळगाव महाराष्ट्र
Share This:

‘सब समाज को लिए साथ में आगे है बढते है जाना’ हे ब्रीद अंगीकारून आदरणीय स्व. डॉ. अविनाशजी आचार्य ऊर्फ दादा यांनी 1991 मध्ये ‘केशव’ अर्थात विष्णूची सेवा सदैव आठवणीतून घडावी, हा विचार मनात ठेवून ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ या सेवारूपी व्रतस्थ संस्थेची स्थापना केली. आज (9 मे) या संस्थेचा 30 वा वर्धापनदिन अर्थात वाढदिवस. या संस्थेच्या 31 वर्षांच्या वाटचालीविषयी…

आदरणीय स्व. डॉ. अविनाशजी आचार्य ऊर्फ दादा यांनी ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ‘सर्व समाजावर आईसारखे प्रेम करा’ या अत्यंत समर्पक भावनेतून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी व आज कार्यरत असलेले 921 सहकारी व विविध प्रकल्पांचे 153 संचालक यांनी केलेले काम, करत असलेली कामे आणि भविष्याचा वेध घेत आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ला मनःपूर्वक शुभेच्छा व ज्या मंडळींना या कार्यातून प्रेरणा मिळाली व ज्यांना या कार्यात आपले योगदान द्यावयाचे आहे त्यांनी आपला वर्षातील एक दिवस सेवाकार्यासाठी समर्पण करावा. मात्र, आदरणीय स्व.दादा डिसेंबर 2003 मध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हणाले होते, ‘‘आजच्या यशाची हवा डोक्यात शिरू देऊ नका. उद्याचा दिवस अजून आव्हानात्मक आहे.’’ या बोधात्मक संदेशाचेही भान राखावे, एवढीच यानिमित्ताने विनंती.

‘केशवस्मृती प्रतिष्ठान’अंतर्गत समाजपरिवर्तनाचे काम अधिक गतीने होत असतानाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. त्याची उत्तम कार्यतत्पर उदाहरणे देता येतील.

* शुद्ध व सात्त्विक घरासारखे जेवण अल्पदरात सुमारे पाच लाखांहून अधिक लोकांना वार्षिक ज्याचा लाभ होतोय ते ‘क्षुधाशांती सेवा संस्था’.
* मायेची ऊब निवांत आणि निसर्गरम्य वातावरणात सुमारे पन्नासहून अधिक आजी-आजोबा त्यांची नयनरम्य सायंकाळ आनंदाने जीवन जगत आहेत, ते म्हणजे आपल्या ‘मातोश्री आनंदाश्रमात’.
* बचतीतून सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट घेऊन प्रत्यक्षात 65 हजारांहून अधिक महिलांचा सहभाग असलेले 3600 हून अधिक ‘महिला बचतगट’.
* गतिमंदांचा आजन्म सांभाळ करणारे प्रौढ गतिमंदांचे विशेष डे केअर सेंटर म्हणजेच ‘आश्रय माझे घर’.
* सेवावस्ती विभागात महिला वाचनालय, भजनी मंडळ, हरितालिका पूजन, व्यवसाय प्रशिक्षण, संस्कार वर्ग, ज्येष्ठ नागरिक संघ, किशोरी विकास प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांवर आपण सेवारत आहोत.
* शिक्षण संस्कारातून निरामय आरोग्याकडे आपल्या आरोग्य केंद्रामार्फत कार्य होते.
* राष्ट्रीय स्तरावर ज्याची विशेष नोंद घेतली गेली त्या रेल्वे स्टेशन व परिसरातील अडचणीत असलेल्या, भरकटलेल्या अशा चारशेहून अधिक मुलांना समतोल प्रकल्पांतर्गत शक्य तेवढ्या सुविधा मिळवून देऊन घरच्यांची भेट घडविण्यात येते. काहींना बालसुधारगृहात दाखल करण्यात येते, तर भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने स्वतंत्र बालसहाय्यता कक्ष चालविले जाते.
* याचबरोबर भुलाबाई महोत्सव, कौशल्य विकास अभ्यासक्रम, रुग्णवाहिका, पाठ्यपुस्तक सहयोग योजना, आचार्य ‘अविनाशी सेवा पुरस्कारा’ने सन्मानित करून जीवनगौरव.
* ऑक्टोबर 2019 पासून संभाजीराजे नाट्यगृहाचे संचालन.
* नोव्हेंबर 2020 पासून थॅलेसिमिया मुक्त समाजासाठी प्रयत्न.
* जानेवारी 2021 पासून गॅस शवदाहिनी. या सर्वांच्या माध्यमातून लाखो व्यक्तींपर्यंत ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून व एक ना अनेक या सेवा समूहांच्या माध्यमातून सेवा दिली जाते.
* शिक्षणक्षेत्रात विवेकानंद प्रतिष्ठान, श्रवण विकास मंदिर, विद्यार्थी विकास केंद्र व कौशल्य विकास प्रबोधिनी हे अत्यंत मोलाची सेवा देत आहेत.
* वैद्यकीय प्रकल्पात माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय यांचे सर्वच उपक्रम लोकाभिमुख सिद्ध झालेले आहेत.
* सर्वांचा आर्थिक कणा असलेली जळगाव जनता सहकारी बँक, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था, जळगाव जनता इन्फोटेक प्रा. लि. या सर्वांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे.
* दैनिक तरुण भारत आताच्या संघर्षमय काळात राष्ट्रविचारांची भूक भागविण्यासाठी पणतीमय प्रयत्न करीत आहे.
* आदरणीय स्व. दादांचा सहभाग असलेल्या ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ या महामंडळाच्या माध्यमातून सचिन नारळे आणि त्यांचे सहकारी आज उत्तमरित्या हे कार्य पार पाडण्याची जबाबदारी पेलत आहेत.


हे सर्व प्रकल्प स्व. डॉ. अविनाशजी आचार्य, स्व. बाळकृष्णजी बेहेडे, आदरणीय रघुजी रारावीकर सर, स्व. वसंतरावजी शर्मा यांच्यासह हजारो लोकांनी समर्पण दिले. आज सिद्धार्थ बाफना, सौ. पल्लवी मयूर, राहुल पवार, किरण बच्छाव, विवेक पलोड, मनीषा खडके, सागर येवले यासह अनेक नवजोश असलेली ही मंडळी अनुभवसंपन्न सेवाव्रती श्री. भरतदादा अमळकर, श्री. अनिल राव सर, श्री. रत्नाकर पाटील, श्री. संजय बिर्ला, श्री. कांतिलाल बडाले, श्री. राजेंद्र नन्नवरे, सुनील याज्ञिक आदी मंडळी भविष्यातील आव्हाने पेेलण्यासाठी तत्पर आहेत. मात्र, असे असताना मनातील काही प्रश्न जे बहुधा समाजाच्याही मनात असावेत ते म्हणजे आपण करीत असलेल्या सामाजिक कार्याचे ऑडिट. आदरणीय स्व. दादा व इतर सर्वांच्या विचारांचा आधार घेऊन भविष्याचा वेध घेणारी निर्णय प्रक्रिया मग ती स्वयंसिद्ध न झालेल्या प्रकल्पांविषयीचे कठोर निर्णय असो की उद्याचे नेतृत्व तयार करण्याची प्रक्रिया असो. हे यानिमित्ताने चिंतन म्हणून गरजेचे.
‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ला मनःपूर्वक शुभेच्छा!

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *