सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

Featured मुंबई
Share This:

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करण्यास सांगितलं जात आहे. अशातच मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचं लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. याबाबत सप्टेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून लस देण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून मुलांचं लसीकरण सुरु होईल, असं एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं.

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं की, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मुलांच्या वापरासाठी सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. यासह ते म्हणाले की फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ती देखील मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.

दरम्यान, 2 ते 3 महिन्यांच्या फॉलोअप आल्याने सप्टेंबरपर्यंच डेटा हाती येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत लसीला मंजुरी मिळेल अशी आशा आहे. असं झाल्यास सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लहान मुलांसाठी लस उपलब्ध असेल, असं गुलेरिया यांनी सांगितलं.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *